लांजा : शिपोशी खामकरवाडीतील पूल कोसळण्याची भीती, नागरिकांच्या जीवितास धोका

Gramin Varta
210 Views

लांजा/ फरहान पाटणकर: तालुक्यातील शिपोशी येथील खामकरवाडी येथे असलेल्या लोखंडी साकवाची अत्यंत दुरावस्था झाली असून या जीर्ण साकवावरून ये-जा करणे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी साकवाची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद उपविभाग बांधकाम, लांजा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

खामकरवाडीतील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी तसेच ग्रामपंचायत कार्यालय, बँक, दवाखाना आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी ग्रामस्थ या साकवाचाच वापर करतात. त्यामुळे तो साकव खामकरवाडी परिसरातील ग्रामस्थांसाठी दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा दुवा ठरला आहे. मात्र सध्या साकवाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून त्यावरील लोखंडी भाग गंजल्याने व कमकुवत झाल्याने ये-जा करणे धोकादायक बनले आहे.

गेल्या चार वर्षांपासून साकवाच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने करण्यात येत असली, तरी संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. सध्या साकवाची अवस्था इतकी खराब झाली आहे की तो कधीही कोसळू शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

यंदाच्या पावसाळ्यापूर्वी साकवाची दुरुस्ती न झाल्यास पावसाच्या काळात खामकरवाडीचा गावाशी संपर्क तुटण्याची शक्यता असून नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे भविष्यातील गंभीर दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने साकवाची पाहणी करून दुरुस्तीची कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थ अनिल महाडिक, अनंत महाडिक, संजय गवळी, लक्ष्मण कोटकर, सुरज कोटकर, दीपक खेडेकर, रुपेश कोटकर यांच्यासह इतर ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *