सिंहगड माऊंटन मॅरेथॉनमध्ये लांजाच्या क्रीडा मार्गदर्शकाची दमदार कामगिरी

Gramin Varta
283 Views

लांजा/ अरबाज नेवरेकर:-पुणे येथील सिंहगड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या ४२ किलोमीटर माऊंटन मॅरेथॉन स्पर्धेत लांजा तालुक्यातील श्रीराम विद्यालय, वेरवली बुद्रुक येथील क्रीडा मार्गदर्शक निलेश कुळये यांनी प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.

त्यांच्या या कामगिरीमुळे विद्यालयासह संपूर्ण लांजा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.अत्यंत खडतर डोंगराळ मार्ग, चढ-उतार आणि आव्हानात्मक परिस्थिती असलेल्या या स्पर्धेत देशभरातील अनेक नामांकित धावपटूंनी सहभाग घेतला होता.


कठोर परिश्रम, नियमित सराव आणि शिस्तबद्ध तयारीच्या जोरावर निलेश कुळये यांनी सर्व स्पर्धकांना मागे टाकत विजेतेपद पटकावले.

कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी सातत्याने सराव सुरू ठेवला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी हे यश मिळविले. त्यांच्या या कामगिरीची क्रीडा क्षेत्रातही विशेष दखल घेतली जात आहे.

क्रीडा मार्गदर्शक म्हणून कार्यरत असलेल्या निलेश कुळये यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील अनेक विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवत आहेत.

त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मैदानी खेळ, तंदुरुस्ती आणि मॅरेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळत आहे.

निलेश कुळये यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *