चिपळूण: चिपळूण तालुक्यातील कादवड गावचे सुपुत्र ओंकार अनंत उदेग यांनी आपल्या अथक परिश्रमांच्या जोरावर भारतीय सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. आपल्या कुटुंबातील देशसेवेचा वारसा पुढे चालवत ओंकार यांनी सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, लवकरच ते आसाम येथे आपल्या सेवेत रुजू होणार आहेत. त्यांचे चुलते रामचंद्र उदेग आणि शांताराम उदेग हे भारतीय हवाई दलातील निवृत्त सैनिक असून, त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळेच ओंकार यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला होता. या प्रवासात त्यांना त्यांच्या आई-वडिलांचे मोलाचे पाठबळ आणि मार्गदर्शन लाभले.
ओंकार यांच्या या यशस्वी निवडीबद्दल कादवड ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत त्यांची भव्य मिरवणूक काढली आणि त्यांचा यथोचित गौरव केला. यावेळी जेके मैनी युनियनचे पदाधिकारी वसंत चिपळूणकर, अंकुश कदम, शशिकांत शिंदे, राजेश शिंदे, बाबाराम शिंदे, किशोर कदम, संतोष शिंदे, सदानंद भुवड आणि महादेव कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी ओंकार आणि त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एका ग्रामीण भागातील तरुणाने सैन्यात मिळवलेले हे यश कादवड परिसरासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरले आहे.
