संगमेश्वर /एजाज पटेल : आजचे जग हे ‘युज अँड थ्रो’ म्हणजेच वापरा आणि फेका संस्कृतीचे झाले आहे. बाजारात ५० ते १०० रुपयांत मिळणाऱ्या स्वस्त, चिनी बनावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ काबीज केली असून छत्री खराब झाली की ती दुरुस्त करण्यापेक्षा नवी खरेदी करण्याकडे आजच्या पिढीचा कल वाढला आहे. मात्र, अशा बदलत्या काळातही काही पारंपरिक व्यवसाय आपली पाळेमुळे घट्ट रोवून उभे आहेत. त्यातलाच एक महत्त्वाचा आणि पावसाळ्यात प्रकर्षाने समोर येणारा व्यवसाय म्हणजे छत्री दुरुस्ती.
काही वर्षांपूर्वीपर्यंत पावसाळा जवळ आला की गल्लीबोळात छत्री दुरुस्त करणाऱ्यांचे स्टॉल्स किंवा फिरते कारागीर दिसायचे. आज त्यांची संख्या नक्कीच कमी झाली आहे, कारण बाजारपेठेत स्वस्त प्लास्टिकच्या आणि ‘वन-टाइम युज’ छत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. एकदा काडी तुटली किंवा कापड फाटले की फेकून द्या, अशी मानसिकता ग्राहकांची झाली आहे. परंतु, या फेकून देण्याच्या संस्कृतीतही छत्री दुरुस्तीचा व्यवसाय केवळ जिवंतच नाही, तर काही प्रमाणात अधिक विशेष बनला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गुणवत्ता आणि लोकांचा जुन्या वस्तूंशी असलेला भावनिक जिव्हाळा.
हा व्यवसाय आता फक्त साधी काडी बदलणे एवढ्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याला आता एक प्रकारे विशेष स्वरूप आले आहे. आजकाल बाजारात हजारो रुपयांच्या ब्रँडेड, थ्री-फोल्ड किंवा ऑटोमॅटिक छत्र्या मिळतात. अशा महागड्या छत्र्या खराब झाल्यास त्या फेकणे परवडत नाही. आधुनिक छत्र्यांची रचना गुंतागुंतीची असल्याने त्यांची स्प्रिंग, लॉक किंवा बटन दुरुस्त करण्यासाठी विशेष तांत्रिक कौशल्याची गरज असते, जी फक्त अनुभवी कारागिरांकडेच असते. जुन्या दर्जेदार छत्र्यांचे सुटे भाग मिळणे कठीण झाले असले, तरी हे कारागीर जुन्या छत्र्यांचे भाग वापरून उत्तम जुगाड करतात आणि छत्री पुन्हा नवीन सारखी करून देतात.
या व्यवसायाबाबत आणि बदलत्या मानसिकतेबद्दल बोलताना छत्री दुरुस्ती कारागीर सुभाष चव्हाण यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “आज बाजारात मिळणाऱ्या स्वस्त छत्र्या एका वाऱ्यात उलटतात आणि कचऱ्यात जातात. पण लोकांकडे असलेल्या जुन्या, दर्जेदार किंवा ब्रँडेड छत्र्या ते फेकून देत नाहीत. काही छत्र्यांशी लोकांच्या आठवणी जोडलेल्या असतात, तर काही छत्र्या आजोबा-पणजोबांच्या काळातील असतात. अशा छत्र्या दुरुस्त करून घेण्यासाठी आजही लोक आमच्याकडे गर्दी करतात. ‘युज अँड थ्रो’च्या काळात ग्राहक टिकवणे कठीण झाले असले, तरी जेव्हा एखादी महागडी किंवा आवडीची छत्री आम्ही अगदी कमी खर्चात दुरुस्त करून देतो, तेव्हा ग्राहकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. हा व्यवसाय हंगामी असला तरी या काळात प्रामाणिकपणे काम केले तर हक्काची भाकर नक्कीच मिळते.”
हा व्यवसाय जरी हंगामी असला तरी पावसाळ्याच्या तीन-चार महिन्यांत या कारागिरांना श्वास घ्यायलाही वेळ नसतो. छत्री दुरुस्तीचा खर्च साधारणपणे ५० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत येतो, जो नवीन चांगल्या दर्जाची छत्री घेण्यापेक्षा ग्राहकांना परवडणारा ठरतो. ‘युज अँड थ्रो’ संस्कृतीमुळे कचरा आणि प्लास्टिकचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत असताना, वस्तू दुरुस्त करून पुन्हा वापरणे ही काळाची गरज बनली आहे. छत्री दुरुस्ती करणारे कारागीर अप्रत्यक्षपणे पर्यावरणाची मोठी सेवाच करत आहेत. मॉल संस्कृतीच्या आणि ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात, पावसाच्या पहिल्या सरीसोबत सुरू होणारी ही छत्री दुरुस्तीची दुकाने आजही आपल्या गरजेचा एक अविभाज्य भाग आहेत.
‘युज अँड थ्रो’च्या युगातही टिकून असलेला ‘छत्री दुरुस्ती’चा पारंपरिक व्यवसाय; पावसाळ्यात आजही वाढतेय मागणी
Leave a Comment
