काँक्रीटीकरण झाले; पण निचऱ्याची सोयच नाही! गणपतीपुळ्यात पावसाचे पाणी दुकानांत, पर्यटकही त्रस्त

Gramin Varta
67 Views

गणपतीपुळे / वैभव पवार : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे रस्त्याच्या काँक्रीटीकरणानंतर पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था न केल्याने स्थानिक स्टॉलधारक, व्यावसायिक आणि पर्यटकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाण्याच्या निचऱ्यासाठी आवश्यक पाईपलाईन न टाकल्यामुळे पावसाचे पाणी थेट मुख्य रस्त्यावर तसेच दुकानांमध्ये शिरत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

पर्यटन विकास आराखड्यांतर्गत ‘आपटा तिठा ते शासकीय विश्रामगृह’ या मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागा ठेवण्यात आली असली तरी त्या ठिकाणी पाईप टाकण्यात आलेले नसल्याने पाणी पुढे न जाता जागेवरच साचत आहे. त्यामुळे रस्त्यालगतच्या स्टॉल आणि दुकानांमध्ये पाणी घुसून व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.
सध्या पावसाचा जोर कमी असतानाही ही परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात मुसळधार पाऊस झाल्यास श्री गणपती मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतूक आणि भाविकांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशभरातून येणाऱ्या हजारो पर्यटकांनाही या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागणार असल्याने त्यांच्या गैरसोयीमध्ये भर पडणार आहे.

या समस्येची गांभीर्याने दखल घेत गणपतीपुळे ग्रामपंचायतीने १२ जून २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्यांना पत्र पाठवून तातडीने पाईप टाकण्याची मागणी केली आहे. पावसाचा जोर वाढण्यापूर्वीच आवश्यक काम पूर्ण करावे, अन्यथा परिस्थिती अधिक गंभीर होऊन स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागेल, असा इशाराही ग्रामपंचायतीने दिला आहे.

ग्रामपंचायतीच्या पत्रानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करणार की स्थानिक आणि पर्यटकांना पावसाळाभर या समस्येला सामोरे जावे लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *