रत्नागिरी : मिरजोळे-उक्षी मार्गावरील फणसवले पवार कोंड येथे गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोन बसमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. या अपघातात पटवर्धन हायस्कूल व महाविद्यालयातील १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातात एका बस चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
भावे आडोम येथून रत्नागिरीकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस फणसवले येथे आली असता दुसऱ्या बसशी तिची जोरदार धडक झाली. धडकेनंतर बसमधील विद्यार्थ्यांच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनीही रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली. आपल्या मुलांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पालकांची धावपळ सुरू होती.
या अपघातात सुजल सनगरे (१७, पटवर्धन कॉलेज), सिद्धेश खापणे (१७), तन्वी रेवाळे (१६), आदिती सत्यवान कांबळे (१७), तेजस्विनी अशोक खापणे (१७), कल्याणी रेवाळे (१७) यांच्यासह एकूण १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले आहेत. सर्व जखमी भावे आडोम येथील रहिवासी असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
मिरजोळे-उक्षी मार्गावर दोन बसचा भीषण अपघात; पटवर्धन हायस्कूल १५ विद्यार्थी जखमी
Leave a Comment
