‘ऑपरेशन टॅप फॉर सेफ’ : आता गुगल दाखवणार धोक्याची ठिकाणे

Gramin Varta
151 Views

रत्नागिरी पोलिसांचा राज्यातील पहिलाच अभिनव उपक्रम

रत्नागिरी: रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलाने राज्यात पहिल्यांदाच ‘ऑपरेशन टॅप फॉर सेफ’ (Operation T.A.P.E for SAFE) हा विशेष रस्ता सुरक्षा उपक्रम हाती घेतला असून, या माध्यमातून अपघातांमध्ये किमान १० टक्के घट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात तंत्रज्ञान, जनजागृती, कायदेशीर कारवाई आणि अभियांत्रिकी सुधारणा या चार मुख्य स्तंभांवर भर देण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत अपघातप्रवण ठिकाणांचे जीआयएस आधारित मॅपिंग करून ‘गुगल’च्या मदतीने धोक्याच्या ठिकाणांचे विश्लेषण केले जाणार आहे. या विश्लेषणातून ‘सेफ ड्राईव्ह ॲप’ विकसित केले जाणार असून, त्याद्वारे वाहनचालकांना सतर्क केले जाईल.

तंत्रज्ञानाचा वापर करतानाच स्पीडगन, सीसीटीव्ही, बॉडी वॉर्न कॅमेरे आणि आय-रॅड (iRAD) प्रणालीचा प्रभावी वापर करून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
केवळ दंडात्मक कारवाईवर अवलंबून न राहता, शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती कार्यक्रम राबवून हेल्मेट वापर, सीट-बेल्टचा वापर आणि मद्यपान करून वाहन न चालवण्याबाबत प्रबोधन केले जाणार आहे. सतत नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे परवाने रद्द करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असून, अभियांत्रिकी सुधारणांसाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून रस्ते सुरक्षा फलक, रोड मार्किंग आणि स्पीड ब्रेकर्स उभारण्यावर भर दिला जाणार आहे.

या उपक्रमाच्या जिल्हास्तरीय पर्यवेक्षणाची धुरा अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ‘सुरक्षित रस्ता ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे’, हे ब्रीदवाक्य समोर ठेवून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि रस्ता सुरक्षेबाबत काही नाविन्यपूर्ण सूचना असल्यास त्या थेट पोलीस यंत्रणेकडे सादर कराव्यात, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *