अंजणारी घाटात ट्रेलरचा भीषण अपघात; पोलिसांच्या तत्परतेमुळे चालकाचे प्राण वाचले

Gramin Varta
731 Views

लांजा: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी घाटात आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका ट्रेलरचा भीषण अपघात झाला. रत्नागिरीकडून गोव्याच्या दिशेने जाणारा ट्रेलर (क्र. MH-46-DC-2763) अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या संरक्षक कठड्यावर जोरात आदळला. या अपघातात ट्रेलरचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून, चालक राजकुमार रामकिशोर साहू (वय ३५, रा. मध्य प्रदेश) हा वाहनाच्या केबिनमध्ये गंभीर अवस्थेत अडकून पडला होता.

घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे निरीक्षक निळकंठ बगळे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती मैनदाड आणि पोलीस अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जे.सी.बी., फायर ब्रिगेड आणि स्थानिक बचाव यंत्रणांच्या मदतीने केबिन उघडून चालकाची सुखरूप सुटका केली. जखमी चालकाला तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

अपघातामुळे विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी प्रभावी नियोजन करून अल्पावधीतच सुरळीत केली. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बचाव कार्यात स्थानिक नागरिक आणि इतर यंत्रणांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, लांजा पोलिसांच्या या तत्परतेमुळे चालकाचे प्राण वाचल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर अपघाताचा पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत. 

- Advertisement -

Total Visitors :
4827011
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *