रत्नागिरीतील शासकीय आरोग्य सुविधांचा विस्तार होणार; खेड, चिपळूण व गुहागरमधील आरोग्य संस्थांच्या विकासकामांना गती देण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

Gramin Varta
130 Views

मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुढाकार घेतला आहे. खेड तालुक्यातील वावे, चिपळूण तालुक्यातील रामपूर तसेच गुहागर तालुक्यातील गुहागर व आबलोली येथील शासकीय आरोग्य संस्थांच्या रखडलेल्या विकासकामांना तातडीने गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. विधान भवनात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार भास्कर जाधव यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत खेड येथील वावे रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी आवश्यक अंदाजपत्रक आणि पायाभूत सुविधांचे प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. चिपळूणमधील रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी जागेची कमतरता लक्षात घेता, ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा उपलब्ध करून घेण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गुहागर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीच्या जागी नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्याबाबतही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

कोकणातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करत, आरोग्यमंत्री आबिटकर यांनी संबंधित आरोग्य संस्थांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरीतील आरोग्य संस्थांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर विशेष बाब म्हणून विचार करून, आवश्यक निधीसाठी मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. या विकासकामांच्या अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील आरोग्य पायाभूत सुविधा बळकट होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *