मुंबई: पुण्यातील मिथेनॉलयुक्त गावठी दारू दुर्घटनेनंतर राज्य सरकारने कठोर पावले उचलत या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवला आहे. या दुर्घटनेत २२ जणांचा बळी गेल्यानंतर राज्यभरात अवैध मद्यनिर्मिती आणि अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, गेल्या महिनाभरात ४,४५७ गुन्हे दाखल करून ३,३४१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधान परिषदेत या कारवाईची माहिती दिली.
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत घडलेल्या या दुर्घटनेची गंभीर दखल घेत संबंधित पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत १७ आरोपींना अटक करण्यात आली असून, ते सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत. सीआयडीमार्फत या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याने दोषींवर कडक कारवाई होईल, असे संकेत शासनाने दिले आहेत.
अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी सरकारने ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबले आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातून सुमारे १०.९८ कोटी रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अलीकडेच छत्रपती संभाजीनगर येथे भरारी पथकाने केलेल्या कारवाईत नऊ किलो गांजा आणि वाहनासह १०.५३ लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. अवैध मद्य आणि अमली पदार्थांच्या विक्रीविरुद्धची ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाणार असून, अंमली पदार्थ पुरवठादारांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचेही मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले.
