लोणावळा : लोणावळा आणि मावळ परिसरात सुरू असलेल्या विक्रमी आणि मुसळधार पावसामुळे सोमवारी पहाटे परिस्थिती गंभीर बनली असून, विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरडीचा मोठा राडारोडा आणि माती घराच्या अंगावर आल्याने घरातील तीन व्यक्ती आतच अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि महसूल यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. लोणावळ्यात गेल्या २४ तासांत तब्बल ६२५ मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली असून, या पावसाच्या तीव्रतेमुळे संपूर्ण शहर आणि ग्रामीण भाग जलमय झाला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे, तर राष्ट्रीय महामार्गावरील नायगाव-साते भागात पाणी साचल्याने अनेक वाहने अडकून पडली आहेत. पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की, पवनानगर भागातील ओझर्डे येथील रस्ता वाहून गेला असून, पवनानगर व वडगाव मावळ बाजारपेठेत तीन ते चार फूट पाणी साचल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून, पावसाचा हा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
