गणेशोत्सवात दंगली घडवण्याचा डाव? राज ठाकरेंचा सावधानतेचा इशारा

Gramin Varta
164 Views

‘सुजाण हिंदू-मुस्लिमांनी सतर्क राहावे’

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गणेशोत्सवाच्या काळात देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा गंभीर दावा करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

देशातील बेरोजगारी, आर्थिक परिस्थिती, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जातीय आणि धार्मिक वाद निर्माण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात रविवारी आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

गणपती उत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, याच काळात दंगली घडवल्या जाण्याची आपल्याला सर्वाधिक भीती वाटत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अशा घटना घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. लोकांनी त्यात अडकून इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करावे, हा त्यामागचा हेतू असू शकतो, असा दावा त्यांनी केला. मुंबईत नुकत्याच घडलेल्या एक-दोन घटनांकडेही त्यांनी लक्ष वेधले. ‘जो सुजाण हिंदू आहे आणि जो सुजाण मुस्लिम आहे, त्यांनी सतर्क राहावे. आपल्या किंवा त्यांच्या नावाने कुणाला तरी या वादात घुसवून दंगली घडवल्या जाऊ शकतात. यात निष्पाप तरुणांचे नुकसान होईल,’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

दरम्यान, महाराष्ट्रातील सणांमध्ये डीजे आणि डॉल्बीच्या वाढत्या वापरावरही राज ठाकरे यांनी टीका केली. सण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याऐवजी मोठ्या आवाजातील डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट्सचा वापर वाढत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. गोविंदा उत्सव तसेच अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांना व्यासपीठावर नाचवण्याच्या प्रकारावरही त्यांनी आक्षेप घेतला. ही संस्कृती महाराष्ट्राची नसून ती इतर राज्यांमधून आणली जात असल्याचे ते म्हणाले. सण कसे साजरे करावेत, याबाबत प्रोटोकॉल असायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.

पुण्यातील डीजे वादावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. कायद्याने डीजेवर बंदी घालता येत नसल्याचे सांगितले जात असेल, तर नागपुरात डीजे कसा बंद झाला, असा सवाल त्यांनी केला. डीजे आणि डॉल्बीच्या वादात नागरिकांना गुंतवून ठेवून शिक्षण, रोजगार आणि आर्थिक परिस्थितीसारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करवले जात असल्याचे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाच्या आर्थिक विकासाबाबतच्या वक्तव्यावरही राज ठाकरे यांनी टीका केली. देशाचा जीडीपी ७.८ टक्के असल्याचे सांगितले जात असताना परदेशात प्रवास करू नका, सोने खरेदी करू नका, असे आवाहन का केले जात आहे, असा सवाल त्यांनी केला. देशाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असल्याचा दावा करत त्यांनी बेरोजगारीचा मुद्दाही उपस्थित केला. २०२१ ते २०२६ या कालावधीत भारतात आलेल्या ५०३ परदेशी कंपन्यांनी कामकाज बंद केले असल्याचा दावा करत त्याचा रोजगारावर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यावरून झालेल्या वादावरही राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या रांगेत अन्य कोणाचेही छायाचित्र असू नये, असे ते म्हणाले. मात्र नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असल्याने सरकारी कार्यालयांमध्ये त्यांचा फोटो असायला हवा; परंतु तो महापुरुषांच्या छायाचित्रांच्या रांगेत न लावता स्वतंत्र ठिकाणी लावावा, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

धर्माबद्दल अभिमान असणे योग्य आहे; मात्र धर्मांधता समाजाला चुकीच्या दिशेने घेऊन जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून नागरिकांच्या मनात जाणीवपूर्वक राग निर्माण केला जात असून, त्यातून मूलभूत प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना संयम व सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले.

Total Visitors :
4819434
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *