खेड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, या घटनेमुळे प्रशासनाचे अपयश चव्हाट्यावर आले आहे. या परिस्थितीवर भाजप नेते ॲड. वैभव खेडेकर यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनावर निशाणा साधला आहे. कोकणात दरवर्षी पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो, याची जाणीव असतानाही प्रशासनाने ठोस नियोजन केलेले नाही, असा आरोप त्यांनी केला.
घटनास्थळावर रात्री अडीच वाजल्यापासून शेकडो प्रवासी अडकून पडले आहेत. मदतकार्य सुरू असले तरी ते अत्यंत संथ गतीने चालले असून, महामार्गाच्या ठेकेदाराकडे आवश्यक यंत्रसामग्रीची मोठी कमतरता असल्याचे दिसून येत आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या कागदी बैठका घेतल्या जातात, मात्र प्रत्यक्ष संकटाच्या वेळी प्रशासनाची तयारी पूर्णपणे अपुरी पडत असल्याची टीका ॲड. खेडेकर यांनी केली. जर घटनास्थळी पोकलेन, डंपर आणि अन्य यंत्रसामग्री वेळेत उपलब्ध असती, तर दोन ते तीन तासांत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असता. सध्याच्या परिस्थितीमुळे रस्ता लवकर मोकळा होईल की नाही, याबाबत मोठी साशंकता आहे.
महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांसाठी अन्न, पिण्याचे पाणी आणि अन्य मूलभूत सुविधांचाही प्रशासनाकडून पूर्णपणे अभाव आहे. प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. या संपूर्ण प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात हा गंभीर मुद्दा उपस्थित केला जाईल, असा इशारा ॲड. वैभव खेडेकर यांनी दिला आहे. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करत रस्ता लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला व्हावा यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
