खेड: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियातर्फे (ICAI) नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या सी.ए. फायनल परीक्षेच्या निकालात खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा माजी विद्यार्थी शुभम भोसले याने घवघवीत यश संपादन केले आहे. शुभमने आपल्या पहिल्याच प्रयत्नात सी.ए.ची खडतर परीक्षा उत्तीर्ण होत रोटरी स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
शुभमने सन २०२०-२१ मध्ये रोटरी स्कूलमधून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शाळेत शिकत असतानाच त्याने सी.ए. अभ्यासक्रमाची तयारी सुरू केली होती. सी.ए. होण्यासाठी आवश्यक असलेल्या फाउंडेशन आणि इंटरमिजिएट या दोन्ही प्रवेश परीक्षा त्याने पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्या होत्या. त्याच्या या यशात रोटरी स्कूलमधील शिक्षक आणि मार्गदर्शकांचा मोलाचा वाटा असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या या यशाबद्दल प्रा. रूपाली बोडस, प्रा. बाळासाहेब राऊत, प्रा. पारस नलावडे, प्रा. फरहीन काझी आणि प्रा. संतोष पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले.
शुभमच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. शुभमच्या यशाने खेड तालुक्यासह रोटरी स्कूलच्या लौकिकात भर पडली असून, परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.
