क्षत्रिय मराठा मंडळातर्फे गौरव गुणवंतांचा दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांचा सन्मान
रत्नागिरी: दहावी आणि बारावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे असते. या टप्प्यावर मिळालेली कौतुकाची थाप ही विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यासाठी एक मोठी शिदोरी ठरते. आज शिक्षणाच्या अनेक शाखा विस्तारल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडून त्यात परिपूर्ण ज्ञान मिळवावे. दहावी-बारावीचे यश हे केवळ एक शिखर नसून, ती आयुष्यातील यशाच्या नव्या प्रवेशद्वाराची सुरुवात आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी केले.
देसाई बॅंक्वेट हॉल येथे क्षत्रिय मराठा मंडळातर्फे आयोजित दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. शुभांगी बेडेकर उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनात शिल्पा सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगतानाच, आपण शिवरायांचे मावळे असल्याने शून्यातून विश्व निर्माण करण्याचे कौशल्य आपल्याकडे असल्याचे नमूद केले. कठीण प्रसंगांवर जिद्दीने मात करा आणि कितीही मोठे झालात तरी आपले आई-वडील, गुरुजन आणि संस्कृतीचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डॉ. शुभांगी बेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिवापर टाळून वेळेचे योग्य नियोजन करण्याचा सल्ला दिला. आजची पिढी जंक फूडच्या आहारी जात असून, शारीरिक व्यायामाचा अभाव असल्याचे सांगत त्यांनी आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. मोठे स्वप्न पाहतानाच सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवल्यास यश निश्चित मिळते, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्याध्यक्ष राकेश नलावडे यांनी हिंदुत्व जपण्यासह पालकांनी तरुणांच्या वाढत्या व्यसनाधिनतेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. प्रचारप्रमुख संतोष तावडे यांनी मराठा विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजक आणि व्यावसायिक बनावे, यासाठी मंडळ नेहमीच पाठिशी असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष प्राची शिंदे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषांची चरित्रे वाचण्याचे आवाहन करून ही तरुण पिढीच देशाची खरी संपत्ती असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रगीताने झाली, तर श्रेया पाटील हिने गणेशवंदना सादर केली. सचिव योगेश साळवी आणि अमित कदम यांनी सूत्रसंचालन केले. या गौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जात असल्याने आम्हाला प्रोत्साहन मिळत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी मनोगतातून व्यक्त केली.
