सहकार्य करणाऱ्या सर्वांचे फैयाज मुकादम यांनी मानले आभार
रत्नागिरी/ सिकंदर फरास: मजगाव ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून भेडसावणारी विद्युत रोहित्राची (DP) समस्या अखेर मार्गी लागली असून, नवीन डीपीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून ती कार्यान्वित करण्यात आली आहे. मजगाव येथील नवीन ट्रान्सफॉर्मर बसवूनही तो सुरू न केल्याने संतप्त झालेल्या फैयाज मुकादम यांनी २३ जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. या भूमिकेनंतर महावितरण यंत्रणेची धावपळ उडाली आणि प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्यात आले.
या कामासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच, मुज्जू मुकादम, ठेकेदार संघटनेचे श्री. कामत, महावितरणचे वायरमन सुरज पड्यार, स्वप्नील आंबेकर, शुभम आणि अन्य कर्मचारी वर्गाने तातडीने काम पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले. या विजयाबद्दल फैयाज मुकादम यांनी ग्रामीण वार्ता डिजिटल मीडिया,सर्व ग्रामस्थ, मित्र, कार्यकर्ते, वीज कर्मचारी आणि सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे जाहीर आभार मानले आहेत. नवीन डीपी कार्यान्वित झाल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वीज पुरवठ्याचा प्रश्न सुटला असून, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
