चिपळूणातील समीर कोवळे, शाहनवाज शाह, पृथ्वीराज पवार यांचा सहभाग
संगमेश्वर :- चिपळूण शहरातील निसर्ग-पर्यावरण अभ्यासक समीर कोवळे, जल अभ्यासक शाहनवाज शाह, कृषी अभ्यासक पृथ्वीराज पवार ह्यांनी सामुहिकपणे पाटण तालुक्यातील कोयना खोरे परिसराची बहुउद्देशीय निसर्ग अभ्यास मोहीम पार पाडली ही मोहीम अर्थ फाऊंडेशन आणि ग्लोबल चिपळूण ह्या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आखण्यात आली होती. या मोहिमेत कोयना धरणातील पाणी पातळी कमी झाल्याने या सर्व परिसराचा बारकाईने अभ्यास करण्यात आला.
सहभागी शिलेदारांनी या अभिनव स्वयंस्फूर्त मोहिमेदरम्यान सह्याद्री पर्वताच्या रांगा, कोयना खोरे परिसर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगतचे झा लर क्षेत्र (बफर झोन) यामध्ये विविध माध्यमांद्वारे प्रवास केला. काही दुर्गम भागांमध्ये ट्रेकींग- गिर्यारोहण करीत तेथील स्थानिक प्रत्यक्ष निरीक्षणे, पाहणी करण्यात आली. धरण पाणलोट क्षेत्रातील विस्थापित गावे बाजे-वाझेगाव, वनकुसवडे, पळासरी इ. गावांच्या जंगल परिसर, कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचा काही भाग, त्याच्या आसपासची काही गांवे, लोकवस्ती, शेतशिवार इ.ची पाहणी करण्यात आली.
यावर्षी उन्हाळा ऋतु लांबल्याने सर्वत्र उष्णतेचा कहर अनुभवयास येत आहे. त्याचे निसर्गावर, मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहेत. कोयना धरणाच्या शिवसागराच्या साठवणूक केलेल्या जलाशयाची जलपातळी झपाट्याने खालावत आहे. स्थानिक ग्रामस्थ हणमंत सुतार यांचेकडून समजलेली माहिती अशी की, सन २००० पूर्वी याभागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. त्यामुळे जमिनीची धूप होऊन माती या जलाशयामध्ये येवून मूळ जलाशयाच्या पाणी साठवणूक क्षेत्रात गाळ साचला आहे. त्यामुळे पाणी साठवणूक क्षमता ३० ते ३५ टक्के कमी झाली आहे. जंगल परिसरामध्ये ॲकेशिया,निलगिरी यासारखी विदेशी वृक्षांची संख्या अधिक प्रमाणात निदर्शनास आली. त्याचप्रमाणे धरण जवळ असूनसुद्धा सिंचन यंत्रणेचा अभाव असल्याचे दिसले. ह्या दुर्गम भागांतील शेती व त्यापूरक व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम दिसून आले. शेती, गुरेढोरे व शेळी पालन ह्यावर स्थानिक लोकजीवन अवलंबून आहे.
धरणाच्या जलाशयाची जलपातळी घटल्यामुळे पूर्वीच्या काळी धरणाच्या निर्मितीपूर्वी बुडित क्षेत्रातील घरांचे, मंदिरांचे अवशेष उघडे पडले आहेत. बाझे- वाजेगावचे ग्रामदैवत श्रीदेवी बाजूबाई, श्री लक्ष्मी देवी मंदिर, राणीबाईचा वाडा, मानवी वापराच्या घरगुती पुरातन वस्तूं इ.चे अवशेष यांची मोहीमवीर अभ्यासकांनी पाहणी केली. तसेच पळासरी गावच्या बुडित क्षेत्रातील देखील जुन्या लोकवस्तीचे घरांचे अवशेष, मारुती मंदिर यांची पाहणी करण्यात आली.
परतीच्या प्रवासात मोहिमवीरiतर्फे वनकुसवडेमधील उंबरघळ मधील नैसर्गिक पुरातन गुहा परिसराची पाहणी करण्यात आली. ह्या बहुउद्देशीय अभ्यास मोहिमेकरिता पाटणचे स्थानिक गाईड निलेश फुटाणे, हणमंत सुतार यांचे मार्गदर्शन लाभले. सदरहू महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ठरलेल्या कोयना खोऱ्याच्या काही दुर्गम भागाची स्वयंस्फूर्त अभ्यास मोहीम नियोजित बहुउद्देशांनुसार पार पडली.
कोयना धरणातील पाणी पातळी कमी झाल्याने अभ्यासकांची निसर्ग अभ्यास मोहीम यशस्वी
Leave a Comment
