रायगड: जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीपात्रात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. चावणे येथील पाताळगंगा एमआयडीसी परिसरात असलेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (HPCL) गॅस बॉटलिंग प्लांटमध्ये पुराचे पाणी शिरल्याने तब्बल ३,००० गॅस सिलेंडर नदीच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रायगडमध्ये कोसळत असलेल्या अतिवृष्टीचा मोठा तडाखा या औद्योगिक वसाहतीला बसला असून, बुधवारी दुपारी कंपनीच्या आवारात पाणी घुसल्याने भरलेले आणि रिकामे मिळून सुमारे ३,००० सिलेंडर थेट नदीपात्रात वाहून गेले. दरम्यान, पेणजवळील खारपाडा येथे नदीच्या पाण्यात हे सिलेंडर तरंगताना पाहून स्थानिक नागरिकांनी ते पकडण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नागरिक आपला जीव धोक्यात घालून हे सिलेंडर पाण्याबाहेर काढत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने तातडीने हायअलर्ट जारी केला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीचे आवाहन केले असून, नदी परिसरात कोणालाही सिलेंडर आढळल्यास ते स्वतःकडे न ठेवता त्वरित एचपीसीएलचे स्थानिक वितरक, तहसीलदार कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
