चिपळूण : वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत बुधवारी सायंकाळी अचानक झालेल्या वाढीमुळे एनरॉन पूल परिसरात एका कुटुंबावर जीवघेणे संकट ओढवले होते. कोळकेवाडी धरणातून वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्यात आल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आणि परिसरातील एका घराला पाण्याने वेढा घातला. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने आणि पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने हे कुटुंब संकटात अडकले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरसेवक प्रमोद बुरटे यांनी तात्काळ नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांना माहिती दिली.
माहिती मिळताच नगराध्यक्ष सकपाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा वाढता वेग आणि धोकादायक स्थिती असतानाही, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, बांधकाम सभापती कपिल शिर्के, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे आणि नगरपालिका पथकाने दोरी व सुरक्षा साहित्याच्या सहाय्याने अतिशय नियोजनबद्ध आणि धाडसी बचावकार्य राबवले. या मोहिमेत मंगेश पेढाम्बकर, नगरसेवक प्रमोद बुरटे, बापू साडविलकर, रतन पवार, सुयोग चव्हाण, दयानंद जुवळे, निलेश किंजळकर, अजय कासारे, गोट्या मोहिते, इकबाल इरफान, सिद्धेश रेडीज आणि निखिल शेट्टी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्वांच्या समन्वयामुळे अडकलेल्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या धाडसी कामगिरीबद्दल उपस्थित नागरिकांनी नगराध्यक्ष व पथकाचे कौतुक केले. दरम्यान, पावसाचा जोर आणि नदीची पाणी पातळी पाहता, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे
