काहीच बोलत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान
रत्नागिरी : छत्तीसगड येथून रेल्वेने प्रवास करत रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोहोचलेली सुमारे १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी गोंधळलेल्या अवस्थेत रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आली. ती सतत रडत असल्याने रेल्वे पोलिसांनी तातडीने विचारपूस करत ताब्यात घेतले. या मुलीचे रत्नागिरीत येण्यामागचे नेमके कारण काय, ती घरातून चुकून आली आहे की कोणीतरी फूस लावून तिला येथे आणले आहे, याबाबत रेल्वे पोलीस विविध शक्यतांचा तपास करत आहेत.
रेल्वे स्थानकावर एकटी आणि संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळल्यानंतर पोलिसांनी तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती काहीही बोलत नसून सतत रडत असल्याने तिच्याकडून कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. तिची मानसिक आणि शारीरिक स्थिती लक्षात घेऊन तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार आणि आवश्यक समुपदेशन सुरू आहे. रत्नागिरी शहर पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला त्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र, मुलगी अद्याप कोणाशीही संवाद साधत नसून सतत रडत असल्याने तपासात अडचणी येत आहेत.
रत्नागिरी पोलीस मुलीची ओळख, तिचा प्रवास आणि रत्नागिरीपर्यंत येण्यामागील नेमके कारण शोधण्याचे काम करत आहेत. संबंधित राज्यातील पोलिसांशी समन्वय साधून पुढील चौकशी सुरू आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलगी सुरक्षित असून तिची योग्य ती काळजी घेतली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
छत्तीसगडवरून १५ वर्षीय मुलगी एकटीच रत्नागिरीत पोहोचली ; कोण घेऊन आले, गूढ वाढले?
Leave a Comment
