रघुवीर घाटात दरडी कोसळल्या, ढगफुटी सदृश्य पावसाने वाहून गेला रस्ता

Gramin Varta
210 Views

खेड : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा खेड तालुक्यातील रघुवीर घाट मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर बाधित झाला आहे. ढगफुटी सदृश्य झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटातील तीन ते चार ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्या असून, एका धोकादायक वळणावर दोन ठिकाणी रस्त्याचा मोठा भाग खोल दरीत वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून घाटातून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे.

घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी डोंगर निसरडे झाले असून, आणखी दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना रघुवीर घाटात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
धबधबे आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रघुवीर घाटात पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी घाट पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे घाटातील धबधब्यांनीही रौद्र रूप धारण केले असून डोंगरातून सतत पाणी, माती आणि दगडांचा प्रवाह सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही मोठे आव्हान ठरणार असून रस्ता पूर्ववत होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

प्रशासनाने नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये, बंदीच्या सूचनांचे पालन करावे आणि पुढील काही दिवस रघुवीर घाट परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *