दापोली-खेड रस्त्याला मोठे भगदाड; नागरिकांसह वाहन चालकांच्या जीवाशी खेळ

Gramin Varta
224 Views

पावसाळ्यात नागरिकांची सुटका होणार असल्याचा वृत्तपत्रातून खोटा दावा; ठेकेदाराचे कौतुक; प्रत्यक्षात रस्त्याचे काम बघा

दापोली : दापोली-खेड रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगत काही ठिकाणी या रस्त्याचे कौतुक केले जात आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पूर्णपणे वेगळी असून, अनेक ठिकाणी रस्त्याला मोठमोठी भगदाडे पडली आहेत. काही ठिकाणी रस्त्याखालची माती वाहून गेल्याने रस्ता खचण्याच्या अवस्थेत पोहोचला असून वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कामाचा दर्जा उघड झाला आहे. रस्त्याच्या कडेला मोठ्या भेगा पडल्या असून काही भागात डांबरासह रस्ता खचू लागला आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही क्षणी मोठा भाग कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी ठेकेदाराकडून केवळ तात्पुरती डागडुजी करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

विशेष म्हणजे, ज्या रस्त्याचे काही वृत्तपत्रांमधून गोडवे गायले जात आहेत, त्याच रस्त्यावर प्रत्यक्षात वाहन चालवणे धोकादायक बनले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या भगदाडांमुळे दुचाकीस्वार आणि चारचाकी चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

निकृष्ट दर्जाचे काम करून जनतेच्या पैशांची उधळपट्टी झाली का, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची ही अवस्था होत असेल तर पुढील काही महिन्यांत परिस्थिती किती गंभीर होईल, याची चिंता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची तांत्रिक पाहणी करून निकृष्ट कामाची चौकशी करावी, दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई करावी आणि तातडीने कायमस्वरूपी दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारावर राहील, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *