मुंबई: पायधुनी परिसरात सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नागरिकांचा तीव्र संताप

Gramin Varta
346 Views

मुंबई : पायधुनी परिसरात एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इमारतीतीलच वॉशरूममध्ये घुसून वॉचमनने हे राक्षसी कृत्य केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेनंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त केला असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इमारतीतील वॉशरूममध्ये गेली असता, तिथे तैनात असलेल्या वॉचमनने संधी साधून आत प्रवेश केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या क्रूर प्रकारामुळे पीडित मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

ही घटना उघडकीस येताच परिसरात संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी मोठ्या संख्येने पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत घेराव घातला आणि आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांविरोधात आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी आणि पोलीस ठाण्याबाहेर अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात पोहोचून घटनेचा आढावा घेतला. यावेळी संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी त्यांना घेराव घालून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या प्रकरणी पायधुनी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून, संबंधित नराधम वॉचमनला अटक केली आहे. सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मुंबईत सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *