स्व.अजितदादा पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार

Gramin Varta
218 Views

शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश

मुंबई: राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याचे नेते स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती आणि आज तात्काळ सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै, २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले असून अजितदादांच्या लोकसेवेचा आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा राज्य शासनाकडून गौरव करण्यात आला आहे.

परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती २२ जुलै, २०२६ (बुधवार) रोजी राज्यभरात साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाणार आहे.याशिवाय सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्येही जयंती साजरी होणार आहे.

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या भागातील सर्व यंत्रणांमध्ये या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

स्वर्गीय अजितदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रशासनावर ठेवलेली मजबूत पकड, पायाभूत सुविधांचा विकास आणि लोककल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेले परिश्रम यामुळे त्यांना जनमानसात हक्काचे ‘दादा’ म्हणून स्थान मिळाले. शासनाचा हा निर्णय म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाला आणि त्यांच्या अविरत कार्यपद्धतीला दिलेली ही एक मोठी आदरांजली मानली जात आहे.यामुळे आता दरवर्षी २२ जुलै रोजी शासकीय स्तरावर दादांच्या लोकसेवेचा वारसा अधिकृतपणे आठवला जाणार आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *