रत्नागिरी : साळवी स्टॉप परिसरात रिक्षाचालकाकडून तरुणावर प्राणघातक हल्ला

Gramin Varta
955 Views

रत्नागिरी :  शहरात एका रिक्षाचालकाने किरकोळ कारणावरून तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १५ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास साळवी स्टॉप परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोशन सुरेश मोरे (वय ४१, रा. नाचणे, रत्नागिरी) हे १५ जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास साळवी स्टॉपजवळील सफारी आशिया हॉटेलच्या बाजूला असलेल्या मुख्य रस्त्यावर आपल्या मित्राशी बोलत उभे होते. यावेळी तिथे असलेल्या एम एच ०८ ए क्य ५१९३ या रिक्षाचा चालक तिथे आला. कोणत्याही कारणाशिवाय या चालकाने वाद घालत फिर्यादी रोशन मोरे यांची मान पकडली. त्यानंतर जवळच पडलेला दगड उचलून तो त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला मारला. या हल्ल्यात मोरे गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर जखमी अवस्थेत फिर्यादी यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित अनोळखी रिक्षाचालकावर भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस रिक्षाचा नंबर आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे साळवी स्टॉप परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *