कोल्हापूर : शहरात रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झालेला संशयित सूरज साखरे याच्यावर अज्ञातांनी भरदिवसा गोळीबार केला. आहे. ही घटना फुलेवाडी रिंग रोड परिसरातील नाना पाटील चौकाजवळ घडली.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की आज भरदुपारी, भररस्त्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सूरज साखरे याच्यावर तीन राऊंड फायर केले. आणि त्यापैकी दोन गोळ्या त्याला लागल्या. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले अशी माहिती समोर आली आहे.जखमी झालेल्या सूरज साखरेला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, करवीर पोलीस आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करत घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
सूरज साखरे याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गतही कारवाई झालेली आहे. त्यामुळे हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, जुन्या वैमनस्यातून हल्ला झाला की टोळीयुद्धाशी त्याचा संबंध आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
कोल्हापुरात रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज साखरेवर अज्ञातांनी केला भर रस्त्यावर गोळीबार
Leave a Comment
