रत्नागिरी-दिवा पॅसेंजरमधील अस्वच्छतेबाबत ग्राहक पंचायतीचे विभागीय पर्यवेक्षकांना निवेदन

Gramin Varta
152 Views

रत्नागिरी: रत्नागिरी-दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीतील स्वच्छतागृहांमधील अस्वच्छतेबाबत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे कोकण रेल्वेच्या विभागीय पर्यवेक्षकांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी-दिवा आणि परतीच्या पॅसेंजर गाड्यांमधील स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेबाबत ग्राहक पंचायतीकडे अनेक प्रवाशांकडून वारंवार तक्रारी होत आहेत. या तक्रारींची सत्यता पडताळून पाहण्यासाठी ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः संबंधित गाडीने प्रवास करून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी गाडीतील स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याचा तसेच त्यांची वेळेवर व नियमानुसार साफसफाई होत नसल्याचा अनुभव वारंवार आला. त्यामुळे प्रवाशांकडून करण्यात आलेल्या तक्रारी वस्तुस्थितीला धरून असल्याचे निदर्शनास आले.

या परिस्थितीमुळे प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागत असून, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. स्वच्छतागृहांची अस्वच्छता ही सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही गंभीर बाब आहे.

या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रत्नागिरी-दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीतील स्वच्छतागृहांची नियमानुसार व नियमित साफसफाई करण्यात यावी, आवश्यक देखभाल करावी तसेच प्रवाशांना नेहमी स्वच्छ व वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाला योग्य त्या सूचना द्याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. ग्राहक पंचायत रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा सचिव आशीष भालेकर, महिला सचिव श्रेया साळवी, तसेच दिलीप कांबळे आणि उमेश नितोरे यांनी हे निवेदन दिले.

या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन कोकण रेल्वेतर्फे देण्यात आले.

Total Visitors :
4827494
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *