रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीकडून १,००० वृक्ष लागवड मोहिमेला प्रारंभ; पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Gramin Varta
69 Views

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या “कर्तव्य जागर फेस्ट २०२६-२७” अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या “१,००० झाडे लावण्याचा संकल्प” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ मंगळवारी पोदार इंटरनॅशनल स्कूल, कारवांचीवाडी  येथे उत्साहात झाला. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी तसेच इंटरॅक्ट क्लबच्या सदस्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना वृक्षलागवडीची शास्त्रोक्त पद्धत  प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आली. खड्डा तयार करण्यापासून रोपाची योग्य लागवड, माती भरताना घ्यावयाची काळजी आणि कंपोस्ट खताचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच केवळ झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे नियमित संगोपन आणि संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

“झाडांवर प्रेम करा… झाडेही तुमच्यावर प्रेम करतील” हा प्रेरणादायी संदेश देत प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे जतन करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही पर्यावरण संरक्षणाची शपथ घेत वृक्षसंवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.इव्हेंट चेअर माधुरी कळंबटे यांनी उपक्रमाचे नियोजन करत विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे, सचिव आनंद चौगुले, पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या प्राजक्ती गायकवाड, धरमसीभाई चौहान, विजय पवार, विनायक हातखंबकर, तन्वी साळुंखे, प्रसाद हातखंबकर, सचिन जाधव,  शिक्षिका आर्वी पाटील उपस्थित होत्या.

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे शहरात पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास आणि वृक्षसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक होण्यास निश्चितच चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *