क्वालिटी वॉल्सच्या आइस्क्रीममध्ये आढळला धारदार प्लास्टिकचा तुकडा; रत्नागिरीतील वकिलाची हिंदुस्तान युनिलिव्हरला कायदेशीर नोटीस

Gramin Varta
277 Views

रत्नागिरी : शहरातील प्रसिद्ध सायबर लॉ तज्ज्ञ ॲड. अमित मधुकर नागवेकर यांना स्वतःच्या घरी खाण्यासाठी आणलेल्या ‘क्वालिटी वॉल्स’च्या ‘केसर भोग’ आइस्क्रीममध्ये धारदार प्लास्टिकचा तुकडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. १ ते २ सेंटीमीटर लांबीचा हा प्लास्टिकचा तुकडा अत्यंत टोकदार असल्याने, तो तोंडात किंवा घशात गेल्यास गंभीर इजा होण्याची शक्यता होती. रत्नागिरीतील वेलनेस फॉरएव्हर मेडिकल स्टोअरमधून खरेदी केलेल्या या आइस्क्रीम टबचा बॅच क्रमांक A17A असून, त्याची उत्पादन तारीख १७ एप्रिल २०२६ आणि वापर मुदत १६ एप्रिल २०२७ आहे.

हे उत्पादन मुदतबाह्य नसून, ते हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या नाशिक येथील कारखान्यात उत्पादित झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. फॅक्टरी-पॅक्ड उत्पादनात अशी धोकादायक वस्तू सापडल्याने कंपनीच्या उत्पादन प्रक्रिया आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अन्न सुरक्षा व मानक कायदा २००६ आणि ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चे हे उल्लंघन असल्याचे मानले जात आहे. ॲड. अमित नागवेकर यांनी या प्रकरणी हिंदुस्तान युनिलिव्हरला कायदेशीर नोटीस बजावून बॅचनिहाय चौकशी अहवाल, नुकसानभरपाई आणि तातडीने सुधारात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

यासोबतच अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाकडे (FSSAI) देखील अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली आहे. यापूर्वीही ॲड. नागवेकर यांनी ऑनलाइन फूड डिलिव्हरीसंदर्भात केलेल्या तक्रारीनंतर राज्य सरकारने कडक नियमावली जाहीर केली होती, त्यामुळे आता या प्रकरणात कंपनीवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी पॅकबंद खाद्यपदार्थ खाण्यापूर्वी ते तपासून पाहावेत आणि त्रुटी आढळल्यास पुराव्यांसह संबंधित प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *