शिंदे सेनेचे नूतन उपसभापती सचिन अहिर यांची मुंबईत घेतली भेट; चर्चांना उधाण
रत्नागिरी: माजी आमदार बाळ माने यांनी विधान परिषदेचे नूतन उपसभापती सचिन अहिर यांची मुंबईत घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीमुळे बाळ माने यांच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, ते आता शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार का, याबाबत राजकीय गोटात खलबते सुरू झाली आहेत.
काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बाळ माने यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतला होता. यावेळी मंत्री नितेश राणे उपस्थित असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या घटनेनंतर पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत ठाकरे गटाने त्यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होती.
मात्र, बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पूर्णविराम लावला होता. जोपर्यंत आपण प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत आहोत, तोपर्यंत माने यांना पक्षात घेतले जाणार नाही, अशी रोखठोक घोषणा त्यांनी केली होती. या घोषणेनंतर बाळ माने काही काळ राजकीय मुख्य प्रवाहापासून दूर राहिले होते.
आता शांततेचा काळ संपवून बाळ माने यांनी पुन्हा एकदा सक्रिय हालचाली सुरू केल्या आहेत. जुने स्नेही असलेले उपसभापती सचिन अहिर यांच्या निवडीचे निमित्त साधून बाळ माने यांनी, मुलगा मिहीर माने यांच्यासह त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना पेव फुटले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, रत्नागिरीत सध्या शिंदे गटातील एका वजनदार नेत्याच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. अशा स्थितीत, बाळ माने यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती धरून जिल्ह्यात आपली पकड पुन्हा मजबूत करण्याची व्यूहरचना आखल्याचे बोलले जात आहे. या भेटीमुळे आता आगामी काळात कोकणच्या राजकारणात कोणते नवे समीकरण जुळून येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
