रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात जगण्यासाठी धडपडणाऱ्या नागरिकांना मृत्यूनंतरही यातना सहन कराव्या लागत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींपैकी तब्बल १९२ गावांमध्ये स्मशानशेडची सोय नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ताही नसल्याने पावसाळ्यात चिखलातून मृतदेह वाहून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर ओढवते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आता जनसुविधेअंतर्गत १९२ स्मशानभूमींच्या बांधकामासाठी ६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी स्मशानशेड बांधण्यासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला होता, मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे हे प्रश्न प्रलंबित राहिले. काही ठिकाणी स्मशानशेड उपलब्ध असली तरी ती अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत आणि त्यांच्या डागडुजीची तातडीने गरज आहे. अनेक स्मशानभूमींमध्ये वीज नसल्याने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. याशिवाय, पावसाळ्यात उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे.
शहरी भागात वैकुंठभूमी आणि विद्युतदाहिनीसारख्या आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असताना, ग्रामीण भागातील जनतेला मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. जनसुविधेअंतर्गत निधी मंजूर होऊनही तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या विलंबामुळे, हे स्मशानशेड प्रत्यक्षात उभे राहेपर्यंत ग्रामस्थांना अजूनही बराच काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. लवकरच या प्रक्रियेला गती देऊन ग्रामीण भागातील स्मशानभूमींची स्थिती सुधारावी, अशी मागणी जोर धरत आहे.
