उक्षी गावात वीज पुरवठ्याचा सहा दिवसांपासून बोजवारा; ग्रामस्थांची महावितरण कार्यालयात धडक

Gramin Varta
366 Views

तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या वरिष्ठांच्या सूचना

रत्नागिरी : तालुक्यातील उक्षी वांद्री परिसरातील वीज पुरवठा गेल्या सहा दिवसांपासून पूर्णपणे खंडित असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रत्नागिरी येथील महावितरणच्या कार्यालयात धडक दिली. सततच्या वीज कपातीमुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण भटकण्याची वेळ आली आहे. वारंवार तक्रारी करूनही स्थानिक अधिकारी आणि लाईनमन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून उक्षी भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्यांच्या मार्गात झाडांच्या फांद्या वाढल्या असून, त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होऊन वीज वाहिनी ट्रिप होण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत वीज नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत, मात्र संबंधित अधिकारी या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्थानिक स्तरावर समस्या सुटत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी एकत्र येत रत्नागिरी महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घातला.

यावेळी महावितरणचे अधिकारी श्री. जाधव आणि श्री. फुलपगारे यांच्यासोबत ग्रामस्थांची सविस्तर चर्चा झाली. ग्रामस्थांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या आणि लाईनमनच्या कारभाराचा पाढा वरिष्ठांसमोर वाचला. वाढलेली झाडी काढण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि देखभाल दुरुस्तीच्या कामातील दिरंगाईमुळेच वीज पुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. ग्रामस्थांचा वाढता रोष पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतली. वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. तसेच, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामस्थांच्या मागण्याही प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील आणि परिसरातील वीज समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन महावितरणच्या वतीने देण्यात आले आहे. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांकडे लक्ष वेधले असून, आता महावितरणकडून यावर किती जलद कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी माजी सरपंच तथा प्रशासक सौ.किरण जाधव,माजी सरपंच मिलिंद खानविलकर,अन्वर गोलंदाज, तसेच अब्दुल मुनाफ खतिब, मुखत्यार काझी,अकबर काझी,रवींद्र जाधव, रेहान खान,इस्माईल काझी,अमोल देसाई,स्वप्नील देसाई,गौरव सावंत, मेहरान काझी, मुझम्मील काझी, ताबिश राजापकर, युसुफ हमदारे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *