रत्नागिरीत ४२ हजारांचे ब्राऊन हेरॉईन जप्त; एकाला अटक

Gramin Varta
304 Views

रत्नागिरी : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून, पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागील बाजूस गगनगिरी मठ रस्त्यावर ४२ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन बाळगणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. अयुब निजाम कोतवडेकर (वय २९, रा. राजीवडा, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी सायंकाळी ७:१५ च्या सुमारास आरोपी अयुब कोतवडेकर हा गगनगिरी मठ रस्त्यावर संशयास्पद स्थितीत मिळून आला.

तो हे अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगत होता. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल निलेश शिवराम शिंगवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ३ ग्रॅम वजनाचे ब्राऊन हेरॉईन सदृश्य अंमली पदार्थ आढळून आले. पोलिसांनी हे अंमली पदार्थ आणि अंमली पदार्थ ठेवण्यासाठी वापरलेली प्लास्टिक पिशवी असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एन.डी.पी.एस. कायदा १९८५ च्या कलमान्वये आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. ५ जुलै रोजी मध्यरात्री १२:४४ वाजता या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यानंतर ५५ मिनिटांनी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रत्नागिरी शहरातील वाढत्या अमली पदार्थांच्या वापराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात असून, याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *