पावसाळ्यात सर्पदंश रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळावेत; गाव विकास समितीची रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Gramin Varta
106 Views

रत्नागिरी: पावसाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागात शेतीकामांची लगबग वाढली आहे. मात्र, याच काळात ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकरी आणि मजुरांना सर्पदंश व विंचूदंश होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्पदंशग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये (दंश झाल्यानंतरचा पहिला तास) स्थानिक पातळीवरच तातडीने आणि वेळेत उपचार मिळावेत, अशी आग्रही मागणी ‘गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटना’ यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात समितीचे अध्यक्ष उदय गोताड आणि संघटन प्रमुख सुहास खांडगाळे यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे साकडे घातले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात समितीने म्हटले आहे की, दुर्गम भागातून वाहतुकीच्या मर्यादांमुळे रुग्णांना थेट जिल्हा रुग्णालयात आणण्यात मोठा वेळ जातो. सर्पदंशानंतरचा पहिला तास हा रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा (गोल्डन अवर) असतो. त्यामुळे प्रशासनाने ग्रामीण जनतेच्या जीविताच्या रक्षणासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

गाव विकास समितीने प्रशासनाकडे प्रामुख्याने तीन मागण्या मांडल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अँटी-स्नेक व्हेनमचा (सर्पविषावरील लस) पुरेसा साठा नेहमी सज्ज ठेवण्यात यावा. दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे, ग्रामीण रुग्णालयांमध्ये वीज खंडित झाल्यास औषध साठवणुकीसाठी पर्यायी कोल्ड चेन (सौर ऊर्जा किंवा इन्व्हर्टर) व्यवस्था चोवीस तास सुरळीत असावी, जेणेकरून लसी खराब होणार नाहीत. तिसरी मागणी, तालुका स्तरावर ॲलर्जी व आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी जीवनरक्षक यंत्रणा आणि प्रशिक्षित डॉक्टरांची २४ तास उपस्थिती अनिवार्य करण्यात यावी.
रत्नागिरी जिल्ह्यातील व कोकणातील कष्टकरी शेतकरी बांधवांना तालुक्याच्या ठिकाणीच वेळेत उपचार मिळून त्यांचे प्राण वाचावेत, या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला तात्काळ आदेश द्यावेत, अशी नम्र विनंती अध्यक्ष उदय गोताड आणि संघटन प्रमुख सुहास खांडगाळे यांनी या पत्राद्वारे केली आहे. आता या संवेदनशील समस्येवर जिल्हा प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *