उक्षी फाटा येथे सर्व एस.टी. बसेस थांबवण्याचे आदेश; ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश

Gramin Varta
171 Views

पालकमंत्री उदय सामंत यांचे विशेष सहकार्य

रत्नागिरी: रत्नागिरी-संगमेश्वर मार्गावरील उक्षी फाटा येथे आता सर्व एस.टी. बसेस थांबणार असून, या निर्णयामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. उक्षी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी वारंवार केलेल्या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाने याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. उक्षी फाटा येथे एस.टी.चा विनंती थांबा मंजूर असूनही अनेक बसेस तिथे थांबविल्या जात नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.

या तक्रारींची गंभीर दखल घेत, आता रत्नागिरी ते संगमेश्वर आणि संगमेश्वर ते रत्नागिरी मार्गावर धावणाऱ्या सर्व फेऱ्या (विशिष्ट एक थांबा फेऱ्यां व्यतिरिक्त) उक्षी फाटा येथे थांबवण्याचे निर्देश आगारांना देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या चालक आणि वाहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. एस.टी. बसेस सुलभतेने थांबवता याव्यात यासाठी, वाहतूक निरीक्षकांनी निश्चित केलेल्या ठिकाणी उक्षी ग्रामपंचायतीला मार्गाच्या दोन्ही बाजूला ‘रा.प. विनंती थांबा उक्षी फाटा’ असे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे उक्षी परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीला अखेर यश आले असून, बस थांब्याअभावी होणारी विद्यार्थ्यांची आणि चाकरमान्यांची ओढाताण थांबणार आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *