रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथे ११५ कोटी ४२ लाख रुपयांचे भव्य आणि अत्याधुनिक प्राणिसंग्रहालय उभारण्यात येणार असून, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकल्पाच्या बांधकामासाठी अधिकृत ई-निविदा जाहीर केली आहे. पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने या भागात पर्यटनवाढीला मोठी गती मिळणार आहे.
मालगुंड हे प्रसिद्ध कवी केशवसुतांचे जन्मगाव म्हणून ओळखले जाते. आता या ऐतिहासिक गावात पर्यटनाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील पर्यटनाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. या भव्य प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एकूण ११५ कोटी ४२ लाख ८७ हजार १५५ रुपयांची ई-निविदा प्रसिद्ध केली आहे. कंत्राटदारांना हा संपूर्ण प्रकल्प कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून २४ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करावा लागणार आहे. या निविदेसाठी ५७ लाख ७२ हजार रुपये इसारा रक्कम आणि १ कोटी १५ लाख ४३ हजार रुपये परफॉर्मन्स सिक्युरिटी म्हणून निश्चित करण्यात आले आहेत.
या प्राणिसंग्रहालयाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे विविध प्रजातींचे प्राणी आणि पक्षी आणले जाणार आहेत. वाघ, बिबट्या, अस्वल आणि लांडगा यांसारख्या हिंस्र वन्यजीवांसाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सुरक्षित आणि नैसर्गिक अधिवास तयार केले जातील. तसेच नीलगाय, काळवीट, चितळ आणि सांबर अशा हरणांच्या विविध प्रजातींसाठी विस्तीर्ण मोकळी जागा राखीव असेल. सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी आधुनिक रेप्टाईल हाऊस आणि दुर्मिळ पक्ष्यांसाठी भव्य पक्षीगृह उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सागरी जीवसृष्टीचे दर्शन घडवणारे भव्य टनेल अॅक्वेरियम असेल, ज्यामध्ये गोड्या व खाऱ्या पाण्याचे दोन आधुनिक विभाग असतील.
या भव्य प्रकल्पाच्या खर्चाची विभागणी विविध कामांमध्ये करण्यात आली आहे. नागरी बांधकामासाठी १ अब्ज ९ कोटी ५३ लाख १३ हजार ६७५ रुपये खर्च केले जातील. तर विद्युत कामांसाठी १३ कोटी २९ लाख ७८ हजार ४४८ रुपये खर्च होणार आहेत.
याव्यतिरिक्त रॉयल्टी आणि टेस्टिंगसाठी ५९ लाख ९७ हजार ३२ रुपये स्वतंत्रपणे खर्च केले जातील. संग्रहालयाच्या सुरक्षेसाठी येथे ३४ आधुनिक मोटराईज्ड गेट ऑपरेटिंग सिस्टीम बसवल्या जातील. या बांधकामासाठी २६०८ क्युबिक मीटर आरसीसी काँक्रीट, २५१.७५ मेट्रिक टन टीएमटी स्टील आणि २१६ मेट्रिक टन स्ट्रक्चरल स्टीलचा वापर केला जाईल. विद्युत कामांतर्गत ३६८ पॉईंट वायरिंग, ३०५० मीटर लांबीची केबल, ५२५ मीटर कंडक्टर, ६२.५ केव्हीए क्षमतेचे डीजी सेट आणि १०० केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवला जाणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या वैभवात मोलाची भर पडेल.
सागरी जीवसृष्टीचा जवळून अनुभव
मालगुंड येथील यासागरी जीवसृष्टी अगदी जवळून अनुभव प्राणिसंग्रहालयाचे मुख्य आकर्षण येथे उभारण्यात येणारे सी वॉटर मरीन कम्युनिटी टनेल अॅक्वेरियम आणि फ्रेशवॉटर मॉन्स्टर टनेल अॅक्वेरियम हे असणार आहे. या आधुनिक जलचरांच्या संरचनेमुळे पर्यटकांना खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील दुर्मिळ सागरी जीवसृष्टी अगदी जवळून अनुभवता येईल, ज्यामुळे हे केंद्र राज्याचे प्रमुख पर्यटन आकर्षण बनेल.
