उक्षी-वांद्री परिसरात ४० तासांपासून वीज गुल; महावितरणच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त

Gramin Varta
47 Views

रत्नागिरी: उक्षी-वांद्री परिसरातील नागरिक गेल्या ४० तासांपासून अंधारात असून, महावितरणच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रविवारी संध्याकाळपासून खंडित झालेला वीजपुरवठा अद्यापही पूर्ववत न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाला तीव्र इशारा दिला आहे.

रविवारी संध्याकाळी तांत्रिक बिघाडामुळे अचानक वीजपुरवठा बंद झाला. मात्र, तब्बल ४० तास उलटूनही महावितरणच्या संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे फोन उचलले जात नाहीत, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांचा आरोप आणि अधिकाऱ्यांची अनास्था

एकीकडे महावितरणचे अधिकारी केबिनमध्ये बसून असताना, दुसरीकडे सामान्य नागरिक आणि गावकरी स्वतः पुढाकार घेऊन विजेचा फॉल्ट शोधण्यासाठी जंगजंग पछाडत आहेत. या भीषण परिस्थितीतही अधिकारी या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना योग्य मार्गदर्शन किंवा सहकार्य मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

जनजीवन विस्कळीत, संपर्काची कोंडी

वीज पुरवठा नसल्यामुळे वांद्री-उक्षी परिसरातील स्थानिक व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. घरात पाणी उपसण्याचे पंप बंद असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यासोबतच, वीज नसल्याने मोबाईलचे टॉवर्सही बंद पडले आहेत. यामुळे बाहेरील जगाशी, विशेषतः मुंबईत असलेल्या नातेवाईकांशी संपर्क तुटला आहे. घरातील वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्याबाबत आणि सुरक्षेबाबत नातेवाईक चिंतेत आहेत.

उग्र आंदोलनाचा इशारा

वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठा असंतोष खदखदत आहे. जर तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही, तर महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
सध्याच्या या कठीण परिस्थितीत महावितरण प्रशासन झोपेतून कधी जागे होणार आणि येथील वीज समस्या कधी सुटणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *