पोलिसांच्या ‘शून्य प्रलंबित अर्ज’च्या दाव्यावर सोनललक्ष्मी घाग यांचा आरोप

Gramin Varta
205 Views

त्यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून काही अज्ञातानी बदनामी केल्याची तक्रार; मात्र कारवाई अद्याप नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी नुकताच ‘हजारो अर्ज आणि शून्य प्रलंबित’ असा दावा करत आपल्या कामकाजाची माहिती प्रसिद्ध केली असली, तरी प्रत्यक्षात काही तक्रारदारांना अद्याप न्यायाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप पुढे आला आहे. उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी आपल्या सायबर तक्रारीवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा करत पोलिसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

घाग यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून काही अज्ञात व्यक्तींनी बदनामी, दिशाभूल आणि मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्यांनी संबंधित सायबर पोलिसांकडे विधिवत तक्रार दाखल केली होती. मात्र, तक्रार दाखल होऊनही अद्याप दोषींविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पोलीस प्रशासन एका बाजूला सर्व अर्ज निकाली काढल्याचा दावा करत असताना दुसऱ्या बाजूला गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्रलंबित असल्याचे चित्र दिसत असल्याने प्रशासनाने याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी घाग यांनी केली आहे. ‘शून्य प्रलंबित अर्ज’ या दाव्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत झाली आहे, याबाबत नागरिकांमध्येही चर्चा सुरू झाली आहे.

सायबर गुन्ह्यांसारख्या संवेदनशील प्रकरणांमध्ये तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे सांगत, पोलिसांनी प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष कार्यवाहीला अधिक प्राधान्य द्यावे, असे आवाहनही घाग यांनी केले आहे.

‘मिशन प्रगती’त आणखी सुधारणा अपेक्षित

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने तक्रारदारांना त्यांच्या प्रकरणाच्या तपासाची माहिती देण्यासाठी ‘मिशन प्रगती’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत एफआयआर नोंद झाल्यानंतर तक्रारदाराला व्हॉट्सअॅपद्वारे माहिती दिली जाते. मात्र, एफआयआरपूर्व तक्रारी किंवा इतर अर्जांच्या स्थितीबाबत कोणतीही अद्ययावत माहिती उपलब्ध होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे अशा सर्व प्रकारच्या तक्रारींची ऑनलाइन स्थितीही उपलब्ध करून देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *