अन्न औषध प्रशासनाची कारवाई : वाशिष्ठी, श्रीनाथ डेअरीसह श्री गणेशनाथ पनीर केंद्रावरील नमुने जप्त

Gramin Varta
568 Views

रत्नागिरी : मंचर दूध भेसळ प्रकरणानंतर रत्नागिरी जिल्ह्यातही  अन्न व औषध प्रशासन विभाग ॲक्टिव्ह मोडमध्ये असून आयुक्त तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार चिपळूणच्या वाशिष्ठी डेअरीसह रत्नागिरीतील श्रीनाथ डेअरी आणि श्री गणेशनाथ पनीर केंद्रावर एकाच वेळी छापे टाकून दूध, तूप, दही आणि पनीरचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आहेत.

मंचर येथे दूध भेसळ प्रकरण उघडकीस आल्यानंतर  जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दूध माफियांना आणि भेसळखोरांना मुळासकट उपटून टाकण्यासाठी एफडीएचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण राज्यात धडक कारवाईचे सक्त निर्देश दिले आहेत. या आदेशाचा भाग म्हणून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कायमस्वरूपी स्वरूपाची तपासणी मोहीम हाती घेतली असून, यामुळे दूध व्यवसायातील काळे धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

या धडक मोहिमेत चिपळूण येथील प्रसिद्ध वाशिष्ठी मिल्क मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर थेट छापा टाकून तिथल्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची कसून तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने या कारखान्यातून दुधाचे दोन वेगळे नमुने आणि शुद्धतेचा दावा करणाऱ्या तुपाचा एक नमुना जप्त केला आहे. ही कारवाई केवळ चिपळूणपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर रत्नागिरी शहरातील नामांकित श्रीनाथ डेअरीतील दही आणि आईस्क्रीम यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर, शहरातील श्री गणेशनाथ पनीर उत्पादक आणि विक्रेते यांच्या प्रतिष्ठानावरही छापा टाकून पनीरचे नमुने जप्त आले आहेत.

वरिष्ठ पदावरून आलेल्या आदेशानुसार संपूर्ण तपासणी प्रक्रिया राबवली जात असून, जप्त केलेले सर्व नमुने तातडीने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेतील अहवालानंतर  पुढील कार्यवाही होणार आहे. दरम्यान यावर रत्नागिरी अन्नसुरक्षा कार्यालयाकडून अत्यंत गोपनीय पद्धतीने कामकाज सुरू असल्याचे वृत्त आहे.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या नावाखाली सुरू असलेल्या या गोरखधंद्यामुळे आणि विषारी भेसळीमुळे आजवर सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी अक्षम्य खेळ खेळला जात होता. लहान मुले, वृद्ध आणि आजारी माणसांच्या ताटात दुधाच्या रूपात थेट विष वाढले जात असल्याच्या जाणीवेमुळे जनतेमध्ये कमालीचा तीव्र संताप आणि नाराजी पसरली होती. आजवर ढिम्म राहिलेल्या प्रशासनामुळे हे भेसळखोर मोकाट सुटले होते; मात्र एफडीएची धुरा तुकाराम मुंढे यांच्यासारख्या धडाडीच्या आणि कडक अधिकाऱ्याच्या हातात येताच, चित्र पूर्णपणे बदलले आहे. त्यांनी जनतेच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत, भ्रष्ट यंत्रणेला आणि भेसळखोरांना थेट आव्हान दिले आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केवळ तात्पुरती कारवाई करून शांत न बसता, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित कायमस्वरूपी तपासणीचे आदेश जारी केले आहेत. म्हणजेच, ही मोहीम केवळ दोन दिवसांचा फार्स नसून, वर्षभर नियमितपणे चालणारी एक निरंतर प्रक्रिया असणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुंढे यांनी राज्यातील सर्व दूध व्यवसायिकांना आणि डेअरी मालकांना अत्यंत कडक शब्दांत आणि जाहीरपणे इशारा दिला होता. वेळीच सुधारलात आणि भेसळ थांबवलीत तर ठीक, अन्यथा थेट तुरुंगाची हवा खावी लागेल, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र मंचर येथील भेसळ प्रकरणानंतर थेट चिपळूण आणि रत्नागिरीतील डेअरींचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

आता या जप्त केलेल्या नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील निष्कर्षाकडे सर्वांचे लागले आहे.  हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, एफडीएच्या या आक्रमक पवित्र्यामुळे दूध क्षेत्रातील काळ्या बाजारवाल्यांचे धाबे मात्र नक्कीच दणाणले आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *