कोदवली धरणातील पाणीसाठ्याची नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे यांच्याकडून पाहणी; पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यावर चर्चा

Gramin Varta
89 Views

राजापूर: राजापूर शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी कोदवली येथे उभारण्यात आलेल्या नवीन धरणाची नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली. राजापूर शहराला अनेक वर्षांपासून ब्रिटिशकालीन धरणातून पाणीपुरवठा केला जातो, मात्र या धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे शहरवासीयांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.

ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्षा ॲड. सौ. खलिफे यांच्या विशेष पाठपुराव्यातून या ठिकाणी समांतर नवीन धरण उभारण्यात आले असून, त्याचे काम यावर्षी पूर्णत्वास आले आहे. या पार्श्वभूमीवर, नवीन धरणात झालेला पाणीसाठा आणि त्याचा योग्य विनियोग करून शहरवासीयांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा कसा करता येईल, यावर या पाहणी दौऱ्यात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी मुख्याधिकारी अभिजित कुंभार, नगरसेवक व आरोग्य सभापती सुलतान ठाकूर, नगरसेवक तथा गटनेते ॲड. जमीर खलिफे, सभापती सौरभ खडपे, अभियंता रणवीर देसाई आणि स्वप्नील पड्यार आदी उपस्थित होते. या नवीन प्रकल्पामुळे भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *