रत्नागिरी: कोकण विभागीय मंडळाच्या वतीने जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून, दोन्ही परीक्षांच्या निकालात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. दहावीचा निकाल १२.२६ टक्के, तर बारावीचा निकाल २०.९० टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालात १५.३९ टक्के आणि बारावीच्या निकालात ११.१५ टक्क्यांची लक्षणीय घट झाली आहे. यंदाही निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनी अधिक यश मिळवत आपले वर्चस्व कायम राखले आहे.
दहावीच्या परीक्षेत १९९ मुलांपैकी केवळ १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ७० मुलींपैकी १५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. बारावीत ४८४ मुलांपैकी ८७ विद्यार्थी, तर २०० मुलींपैकी ५६ विद्यार्थिनींनी यश संपादन केले आहे. दहावीच्या जिल्हानिहाय निकालात रत्नागिरी जिल्हा १६.२० टक्क्यांसह आघाडीवर आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ४.४४ टक्के लागला आहे. याउलट बारावीच्या निकालात सिंधुदुर्ग जिल्हा २४.६७ टक्क्यांसह अव्वल ठरला असून, रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल १९.८१ टक्के राहिला आहे.
बारावीच्या शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेने ३४.०८ टक्क्यांसह बाजी मारली आहे. वाणिज्य शाखेचा निकाल १५.६४ टक्के, कला शाखेचा १३.४४ टक्के, व्यावसायिक शाखेचा ८.३३ टक्के लागला असून, टेक्निकल शाखेचा निकाल मात्र शून्य टक्के लागला आहे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी यंदा सर्व ११ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आले होते. परीक्षेदरम्यान कॉपीचे एकही प्रकरण घडले नसले तरी, परीक्षेनंतरच्या छाननीत दहावीतील ४ आणि बारावीतील १ गैरमार्गाचे प्रकरण समोर आले आहे.
निकालानंतर गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना १५ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक असून, ती मिळाल्यानंतर पुढील पाच कार्यालयीन दिवसांत अर्ज करणे आवश्यक आहे. मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि प्रभारी सचिव प्रेरणा शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने अभ्यासाला लागण्याचे आवाहन केले आहे.
