मुंबई: अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; तीन नामांकित हॉटेलचे परवाने निलंबित

Gramin Varta
406 Views

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (FDA) १३ जुलै रोजी राज्यभर राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत मुंबईतील तीन नामांकित हॉटेलचे परवाने निलंबित करण्याची कठोर कारवाई केली आहे. स्वच्छतेचे गंभीर उल्लंघन आणि अन्नसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, यात भेंडीबाजार परिसरातील शालीमार हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. आणि नूर मोहम्मदी हॉटेल, तसेच उमरखाडी येथील रहमानिया रेस्टॉरंटचा समावेश आहे. या आस्थापनांच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीचा अभाव आणि कीटक नियंत्रणातील त्रुटी आढळून आल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

राज्यभरात राबवण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण १ कोटी ६८ लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये भिवंडीतील गोदामातून १ कोटी ३३ हजार रुपये किमतीची २२,१०० किलो संशयास्पद मिल्क पावडर जप्त करण्यात आली, जी मिसब्रँडेड किंवा उपमानांकित असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय, अमरावती, विरार, मिरा रोड आणि रायगड परिसरात केलेल्या कारवाईत सुमारे ६७ लाख ३० हजार रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करून सात जणांना अटक करण्यात आली आहे. या विशेष मोहिमेत एकूण ३२ हॉटेल व रेस्टॉरंटची तपासणी करून आठ सुधारणा नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. अन्नसुरक्षेबाबतच्या या धडक कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *