खेड: गुणदे येथील श्री सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालयात प्रेरणादायी सोहळा संपन्न; गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा गौरव

Gramin Varta
113 Views

खेड : तालुक्यातील गुणदे येथील श्री सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालयात नुकताच एक अत्यंत प्रेरणादायी आणि स्तुत्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. सरस्वती शिक्षण संस्था, अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठान आणि कै. डॉ. अशोक आंब्रे स्मृती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याला भाजपा आमदार प्रमोद जठार आणि खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या सोहळ्यात समाजासाठी आदर्श ठरणारे विविध उपक्रम राबवून गुणवंतांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात इयत्ता दहावीतील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला, तर माजी विद्यार्थी कै. शशिकांत राजाराम आंब्रे यांच्या स्मृतीनिमित्त पाचवीच्या विद्यार्थ्यांना वृक्षांचे वाटप करण्यात आले. शाळेने सलग आठ वर्षे इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के राखल्याबद्दल मुख्याध्यापिका सौ. अश्विनी सुशिल जोशी आणि त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. शिक्षकांसाठीचा हा गौरव सोहळा उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

या सोहळ्याला भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, उत्तर खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, दक्षिण खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, स्वराज गांधी, ओवैस चौगुले, प्रदीप भोसले, संदीप बांदिवडेकर आणि पप्पू निमनकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रातील या कामगिरीचे मान्यवरांनी कौतुक केले असून, या कार्यक्रमामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *