रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आदिती तटकरे यांचे महत्त्वपूर्ण विधान; भरत गोगावले यांच्या नावावर स्पष्ट केली भूमिका

Gramin Varta
128 Views

अलिबाग: गेल्या दोन वर्षांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असून, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्यात या पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे आणि दोन्ही पक्षांच्या वादामुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्थगित ठेवण्यात आले आहे, या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील दोन आमदारांची राज्याच्या मंत्रीमंडळात वर्णी लागली असून, शिवसेना शिंदे गटाकडून भरत गोगावले यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले.

शिवसेना शिंदे गटाचा विरोध डावलून रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना देण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र शिवसेनेच्या आक्रमक पावित्र्यामुळे अवघ्या २४ तासात या निर्णयाला स्थगिती दिली गेली आणि तेव्हापासून दोन वर्ष होत आली तरी रायगडचे पालकमंत्रीपद स्थगित ठेवण्यात आले असून जिल्हा गेली दोन वर्ष पालकमंत्रीपदाविनाच वाटचाल करत आहे, त्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा कधी सुटणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. विधानपरिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गट या जागेसाठी आग्रही होता कारण कोकणात सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य शिवसेना शिंदे गटाचे असल्याने ही जागा शिवसेना शिंदे गटासाठी सोडण्यात यावी अशी मागणी केली जात होती, पण शिवसेना शिंदे गटाचा विरोध डावलून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिकेत तटकरे यांना सोडण्यात आली आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी या जागेचा आग्रह सोडत राष्ट्रवादी काँग्रेसपुढे नमते घेतले.

या निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना नेत्यांची एक संयुक्त बैठक झाली होती आणि या बैठकीनंतर विधान परिषदेची जागा सोडण्याच्या बदल्यात तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेना शिंदे गटासाठी सोडण्यास अनुकूलता दर्शवली होती तसेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून तो निर्णय घेतील असेही जाहीर केले होते, ज्यामुळे अनिकेत तटकरे यांचा पुन्हा विधान परिषदेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता निवडणुकीनंतर शिवसेनेकडून रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी दबाव वाढविण्यात आला असून, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निवडणुकीत जे ठरले होते त्याची पूर्तता करून रायगडचे पालकमंत्रीपद भरत गोगावले यांच्याकडे सोपवायला हवे अशी मागणी केली आहे, तर आमदार निलेश राणे व आमदार महेंद्र थोरवे यांनीही रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेना शिंदे गटाकडे देण्याची मागणी केली आहे आणि आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी तटकरेंवर टीका करत रायगडचे पालकमंत्रीपद तातडीने गोगावले यांच्याकडे देण्याची मागणी केली आहे, या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आणि पालकमंत्रीपदाच्या दावेदार आदिती तटकरे यांनी आपली भूमिका पहिल्यांदाच मांडली आहे.

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भरत गोगावले झाले तरी त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत असे सांगत आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, पालकमंत्री हे केवळ एक पद आहे, पण जिल्ह्यात दोन मंत्री आहेत आणि त्यामुळे या मंत्रीपदाचा वापर करून जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने पुढे गेले पाहिजे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भातील निर्णय घेतील, मात्र जिल्हा आणि जिल्ह्याचा विकास हा अधिक महत्त्वाचा आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यालाच अधिक महत्त्व देत असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Total Visitors :
4565614
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *