रोहित शर्माच्या सल्ल्याची किमया! रत्नागिरीच्या अविराजचा इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू जलवा

Gramin Varta
227 Views

नाबाद ११६ धावा, ४ विकेट्स आणि तिसऱ्यांदा ‘सामनावीर’ पुरस्कार

रत्नागिरी: रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काऊंटी क्रिकेट लीगमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागांत चमकदार प्रदर्शन करत पुन्हा एकदा सामनावीर पुरस्कारावर नाव कोरले असून, नाबाद ११६ धावांची खेळी आणि चार विकेट्सच्या जोरावर त्याने आपल्या पेशवा क्रिकेट क्लब संघाला आणखी एक संस्मरणीय विजय मिळवून दिला आहे. काही काळापूर्वी भारताचाकर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत इंग्लंडमध्ये सरावादरम्यान अविराजला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती आणि त्यावेळी त्याने रोहितला त्रिफळाचीतही केले होते, ज्यानंतर रोहितने त्याच्या खांद्यावर हात ठेवून क्रिकेटमध्ये मोठे होण्यासाठी कठोर मेहनत करण्याचा आणि प्रत्येक सामन्यात जास्तीत जास्त धावा व विकेट्स मिळवण्याचे लक्ष्य ठेवण्याचा मौल्यवान सल्ला दिला होता जो अविराजने मनापासून स्वीकारला आहे.

मिडलसेक्स काऊंटी क्रिकेट स्पर्धेत झालेल्या सामन्यात पेशवा क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना अविराजला सलामीला पाठवले आणि त्याने सुरुवातीपासून संयमी व आक्रमक खेळ करत ११५ चेंडूंमध्ये १५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ११५ धावा फटकावल्या ज्याच्या बळावर संघाने ४३ षटकांत १८० धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंडन डेस्परॅडोज संघाला अविराजच्या भेदक गोलंदाजीचा सामना करता आला नाही आणि त्याने ९ षटकांत चार महत्त्वाच्या विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाची आघाडीची फळी उद्ध्वस्त केल्यामुळे लंडन डेस्परॅडोजचा डाव १७० धावांवर आटोपला आणि पेशवा क्रिकेट क्लबने सामना आपल्या नावावर केला. फलंदाजीत शतक आणि गोलंदाजीत चार विकेट्स अशा उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अविराजने तिसऱ्यांदा सामनावीर पुरस्कार पटकावला असून रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitors :
4566304
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *