मिऱ्या–नागपूर महामार्गावर संरक्षक भिंत पाडण्याचा प्रकार; कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप

Gramin Varta
304 Views

रत्नागिरी /अजय सावंत : शहरालगतच्या नाचणे ग्रामपंचायत हद्दीतील मिऱ्या–नागपूर महामार्गावर कंत्राटदाराच्या कामकाजाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गणेश कॉलनी परिसरात महामार्गालगत उभारण्यात आलेली संरक्षक काँक्रीट भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात येत असल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संभ्रम व नाराजीचे वातावरण आहे. आधीच पूर्ण केलेले काँक्रीटीकरण पुन्हा का तोडले जात आहे, असा सवाल उपस्थित होत असून, महामार्ग नेमका वाहतुकीसाठी पूर्णपणे कधी खुला होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

‘ग्रामीण वार्ता’ने घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता, संरक्षक भिंत आवश्यकतेपेक्षा जास्त उंच झाल्याने ती कमी करण्यासाठी तोडण्यात येत असल्याची माहिती कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याने दिली. मात्र, या मार्गाचे काँक्रीटीकरण होऊन अनेक दिवस उलटले असताना आणि महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी कामाची पाहणी केल्यानंतरही अशी त्रुटी आता कशी लक्षात आली, याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

दरम्यान, एकीकडे मंत्री स्तरावरून महामार्गाचे काम लवकर पूर्ण होईल, अशी आश्वासने दिली जात असताना दुसरीकडे तयार झालेले काम पुन्हा पाडले जात असल्याने कामाच्या दर्जाबाबत आणि नियोजनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिकांच्या मते, अशा प्रकारामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असून कामाच्या गुणवत्तेवरही शंका निर्माण होत आहे.

महामार्गाचे अनेक टप्पे अद्याप अपूर्ण असून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून नियमित आणि प्रभावी देखरेख होत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. संबंधित अधिकारी क्वचितच प्रत्यक्ष पाहणीसाठी येत असल्याने कंत्राटदारावर आवश्यक नियंत्रण राहत नसल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे.

काही दिवसांपूर्वी या मार्गावरील दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, आता एका बाजूचे काँक्रीटीकरण तोडण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक पुन्हा एकाच लेनवरून सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका वाढल्याची चिंता वाहनचालकांनी व्यक्त केली असून, एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबई–गोवा महामार्गाप्रमाणेच मिऱ्या–नागपूर महामार्गाचे कामही वर्षानुवर्षे रखडू नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून कामातील त्रुटींची चौकशी करावी, संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करत हा महामार्ग सुरक्षित व दर्जेदार पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहतूकदारांनी केली आहे.

Total Visitors :
4576182
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *