चिकन आणि अंड्यांच्या दरात मोठी वाढ, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Gramin Varta
417 Views

रायगड : गेल्या काही दिवसांपासून चिकन आणि बॉयलर अंड्यांच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडला आहे. किरकोळ बाजारात चिकनचा दर प्रतिकिलो 260 रुपयांवर पोहोचला असून, बॉयलर अंड्यांचा दर प्रतिडझन 108 रुपये इतका झाला आहे.

अंड्यांच्या दराने प्रथमच शंभरी पार केल्याने हा ऐतिहासिक उच्चांक मानला जात आहे. तसेच वर्षभरातील चिकनच्या दरातील ही सर्वात मोठी वाढ असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

रायगड जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत अंडी आणि पोल्ट्री उत्पादनांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे मांसाहारी पदार्थ खरेदी करण्यासाठी ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत. या दरवाढीचा परिणाम हॉटेल व्यावसायिक, खानावळी चालक आणि अंडा-चिकनवर आधारित खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरही झाला आहे.

वाढलेल्या उत्पादन आणि वाहतूक खर्चामुळे काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आपल्या पदार्थांच्या किमती वाढवाव्या लागल्या आहेत. दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, लवकरच दर स्थिर होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“अंडी ही गरीब आणि सर्वसामान्यांसाठी स्वस्त प्रथिनांचा महत्त्वाचा स्रोत मानली जात होती; मात्र आता तीही महाग होत असल्याने घरचे बजेट सांभाळणे कठीण होत आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक ग्राहकांनी व्यक्त केली.

चिकन व्यावसायिकांच्या मते, कोंबडी खाद्याच्या वाढलेल्या किमती, इंधन व वाहतूक खर्चातील वाढ, पुरवठ्यातील घट आणि वाढलेली मागणी ही दरवाढीमागील प्रमुख कारणे आहेत.

आगामी काळात चिकन आणि अंड्यांचे दर आणखी वाढणार की स्थिर होणार, याकडे ग्राहकांसह व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4572178
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *