अजितदादांच्या जयंतीनिमित्त दापोलीत स्वच्छता अभियान उत्साहात!

Gramin Varta
25 Views

दापोली : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दापोली शहरात बुधवारी सकाळी विशेष स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले असून, “एक दिवस महाराष्ट्राच्या दादांसाठी” या संकल्पनेत आयोजित करण्यात आलेल्या या अभियानाला नागरिक, युवक, विद्यार्थी, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, केळस्कर नाका येथे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आणि त्यानंतर केळस्कर नाका ते एसटी स्थानक परिसर तसेच शहरातील विविध भागांत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून रस्त्याच्या दुतर्फा पडलेला कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

“स्वच्छ दापोली… सुंदर दापोली… निरोगी दापोली” हा संदेश देत राबविण्यात आलेल्या या अभियानात रामराजे महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिक, अजितदादा प्रेमी तरुण-तरुणी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नगरसेविका सौ. साधना बाळासाहेब बोत्रे यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिकांचे आभार मानले आणि स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा, असे आवाहन केले.

अजितदादांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानातून दापोलीकरांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव जपत शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून शहराच्या स्वच्छतेसाठी सामूहिक सहभागाचे हे अभियान दापोलीसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे, नगरसेविका तथा महिला जिल्हाध्यक्ष सौ. साधना बोत्रे, तालुकाध्यक्ष सौ विनिता शिगवण, श्री सचिन तोडणकर, सौ निशा सावंत, नितीन मयेकर, विद्यार्थी तसेच दापोलीतील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitors :
4573635
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *