‘रायझिंग फ्लॉवर’ उपक्रमांतर्गत प्रभानवल्ली, व्हेळ विद्यालयात लांजा पोलिस ठाण्यातर्फे विद्यार्थ्यांना सायबर फसवणुकीबाबत जनजागृती

Gramin Varta
68 Views

लांजा/अरबाज नेवरेकर: रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेनुसार कार्यान्वित असलेल्या ‘मिसिंग रायझिंग फ्लॉवर’ उपक्रमांतर्गत लांजा पोलीस ठाण्याच्या वतीने प्रभानवल्ली व व्हेळ विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये सायबर फसवणूक, अमली पदार्थ, वाहतूक नियम, वैयक्तिक सुरक्षितता आणि करिअरच्या संधींबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांना सायबर फसवणुकीचे विविध प्रकार, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, डिजिटल गोपनीयता, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी तसेच सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्याच्या पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंक, संदेश किंवा फोनला प्रतिसाद देताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही करण्यात आले.

अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व, वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर तसेच अल्पवयीन मुलांनी वाहन चालविण्याचे धोके याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच चांगला व वाईट स्पर्श, वैयक्तिक सुरक्षितता, अनुचित प्रकार घडल्यास विश्वासू व्यक्तीला माहिती देणे आणि बालकांवरील लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमातील तरतुदी याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले.

पोलीस दलासह विविध शासकीय सेवांमधील करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी, कौशल्य विकास आणि करिअर नियोजन याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमानंतर विद्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे, बीट अंमलदार विलास जाधव, माजी सरपंच सुरेश शिगम, दिलीप पळसुलेदेसाई, चंद्रकांत काळंबे, मुख्याध्यापक रमेश तरवडेकर यांच्यासह शिक्षक, पोलीस कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Total Visitors :
4590888
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *