पंढरपूर: आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी वारकऱ्यांनी ९ कोटी ९२ लाख रुपयांहून अधिक रकमेची देणगी अर्पण केली आहे. रोख देणगी, सोन्या-चांदीचे दागिने, लाडू प्रसाद विक्री, हुंडी, भक्तनिवास तसेच इतर विविध माध्यमांतून हे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यंदाच्या आषाढी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन ४ लाख ९५ हजार २२ भाविकांनी, तर मुखदर्शन ५ लाख ४२ हजार भाविकांनी घेतले. कळस दर्शनासह सुमारे ३२ लाख वारकऱ्यांनी यात्रेत सहभाग नोंदविला. दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असूनही भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे यासाठी मंदिर समितीने आवश्यक नियोजन आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
आषाढ शुद्ध १ ते आषाढ शुद्ध १५ या कालावधीत श्रींच्या चरणी ७१ लाख ४४ हजार ७८ रुपयांची थेट अर्पण देणगी प्राप्त झाली.
याशिवाय रोख देणगीतून २ कोटी ९३ लाख ९७ हजार ७६ रुपये, लाडू प्रसाद विक्रीतून ८३ लाख ४७ हजार रुपये, भक्तनिवासातून ४६ लाख ३१ हजार १०३ रुपये, हुंडीपेटीतून २ कोटी ४० लाख ३२ हजार ४०२ रुपये, परिवार देवतांच्या देणगीतून १५ लाख २७ हजार ४४३ रुपये, सोने-चांदी अर्पणातून ९६ लाख ७२ हजार ९३७ रुपये तसेच अगरबत्ती, चंदन, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमांतून ४५ लाख २० हजार ४३९ रुपयांचे उत्पन्न मंदिर समितीला प्राप्त झाले.
या सर्व माध्यमांतून मंदिर समितीला एकूण ९ कोटी ९२ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले असून, यंदाच्या आषाढी यात्रेत वारकऱ्यांनी मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी देणगी अर्पण केल्याचे मंदिर समितीने नमूद केले आहे.
आषाढी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी ९.९२ कोटींची देणगी अर्पण
Leave a Comment





